भाजपमध्ये वाढणारी अंतर्गत बंडखोरी?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव हा जनतेच्या विरोधात झालेल्या बेईमानीमुळेच झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतूनच ही बाब स्पष्ट झाल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
लोकशाही अधिक मजबूत व्हायची असेल तर जनतेच्या मताचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. जनतेचा अधिकार कायम राहिला, तरच देश आणि लोकशाही अधिक शक्तिशाली होईल, असेही ते म्हणाले. काँग्रेसचा पराभव हा राजकीय नव्हे, तर बेईमानीने लादलेला पराभव असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींच्या श्रीराम वक्तव्यावर बोलताना नाना पटोले यांनी माध्यमांवर चुकीचा अर्थ काढल्याचा आरोप केला. राहुल गांधी हे शोषित, पीडित, शेतकरी आणि संविधान वाचवण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भगवान श्रीरामांच्या विचारांच्या मार्गावर राहुल गांधी चालत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी नाना पटोले यांनी भाजपमध्ये लवकरच मोठी अंतर्गत बंडखोरी होणार असल्याचा इशाराही दिला. महागाई, बेरोजगारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्यावरून त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. भाजप जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.






