मासळी बाजारात मासे कापण्यास निर्बंध घातल्याचे वृत्त खोटे
लोकवाहिनी न्यूज:मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादले नसल्याचे स्पष्ट केले. कोळी भगिनी आणि बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. ही कोळ्यांची मुंबई आहे. उबाठाकडे आता काहीच विषय राहिले नाहीत. त्यामुळे षडयंत्र रचून रिल्स व्हायरल केले जात आहेत. उलट आम्ही कोळी बांधवांसाठी मासळी बाजार बांधून देणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने निर्बंध लादल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. मासळी विक्रेत्या महिला, कोळी बांधव आक्रमक झाले असतानाच विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका केली. या पार्श्वभूमीवर महापौर तावडे यांनी स्पष्टीकरण दिले. मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे. मुंबईची महापौर म्हणून मी आणि महानगरपालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मी बोलते, बिनधास्त मासे कापा, मी इथे उभी आहे. मासा कसा घरी न्यावा, हे ग्राहकांवर अवलंबून असते. मासे कापण्याच्या बंदीबाबतची बातमी फक्त ‘सामना’ वृत्तपत्रात आली आहे, इतर कुठेही नाही. मुंबई कोळ्यांची आहे, कोणाच्या बापाची नाही. कोळी बांधवांच्या पाठीशी शिंदे साहेबदेखील आहेत. कोळी भगिनींना आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना आम्ही आईस बॉक्ससुद्धा देतोय. कोळी बांधवांच्या साधेपणाचा फायदा घेत उबाठा गट अफवा पसरवत आहेत”, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.








