मे. हायके एएस कंपनीसोबत सामंजस्य करार
लोकवाहिनी न्यूज,मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित मे. हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आधुनिक जलयाने उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्रात जहाजबांधणी सुविधा निर्माण करण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार (गुंतवणूक आणि धोरण) कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., नॉर्वेच्या मानद कॉन्स्युल जनरल मोनिका नागेलार्ड, स्वीडनचे कॉन्स्युल जनरल स्वेन ऑस्टरबर्ग, हायकेचे अध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स आदी उपस्थित होते.
या सामंजस्य करारावर महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आणि नॉर्वेच्या मे. हायके एएसचे अध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स यांनी स्वाक्षरी केली.
वर्षा निवासस्थानी हा करार झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचे सातत्याने काम सुरू आहे. मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून, त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती. मुंबईसारख्या महानगरात जलमार्गाचा प्रभावी वापर केल्यास वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. देशभरात जलवाहतुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध असून, आगामी काळात शाश्वत वॉटर ट्रान्सपोर्टची मागणी झपाट्याने वाढणार आहे. मुंबईत सुरू होत असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठीही मार्गदर्शक ठरेल.
या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या नॉर्वेच्या मे. हायके एएस यांच्यासह अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. विशेषतः या उपक्रमासाठी सर्वांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, संबंधित अधिकारी आणि भागीदार संस्थांचेही मुख्यमंत्री यांनी कौतुक केले.
रुरल एन्हांसर्स ग्रुपचे एमडी आणि सीईओ अंबर आयाडे, नॉर्वे येथील नताशा ब्रगांझा, ‘स्कॅन्डियन नो’चे एमडी आणि सीईओ प्रशांत अग्रवाल, स्वीडन-इंडिया बिझनेस कौन्सिलचे चीफ इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह सेसिलिया ओल्डने, यूएई येथील इक्विलाइन फायनान्सचे डायरेक्टर अंशुल दवानी आदी यावेळी उपस्थित होते.








