राजघराण्यांची हायकोर्टात याचिका
लोकवाहिनी न्यूज:मुंबई : एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, या विरोधात महाराष्ट्रातील शाही घराण्यांचे वंशज आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. नागपूरच्या भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी सुरुवातीपासूनच या विषयाबाबत आक्रमक भूमिका घेत हे प्रकरण लावून धरले होते. यात आता जिजाऊ घराण्याचे शिवाजी दत्तात्रय राजे जाधव आणि रायगडचे रघुजीराजे शाहूजीराजे आंग्रे, साताऱ्याच्या शाही घराण्याशी संबंधित राजे मुधोजीराजे अजितसिंहराव भोसले याचिकाकर्ते असून यांच्या वतीने ॲड. आशिष गायकवाड यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
जुलै २०२५ मध्ये एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या ‘Exploring Society : India and Beyond Part-I’ या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित केली होती. या पुस्तकाच्या ७१व्या पानावर ‘मराठा साम्राज्य’ दर्शवणारा नकाशा होता. या नकाशामध्ये १७५९ च्या काळातील मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवण्यात आला होता. दक्षिणेत तंजावरपासून उत्तरेत पेशावरपर्यंत आणि पूर्वेला कटकपर्यंत मराठा साम्राज्य पसरल्याचे त्यात दर्शवण्यात आले होते. याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की, राजस्थानमधील काही शाही घराणी आणि काही राजकीय नेत्यांनी या नकाशावर आक्षेप घेतल्यानंतर एनसीईआरटीने घाईघाईने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. मात्र, या समितीने कोणतीही ऐतिहासिक पडताळणी न करता आणि कोणतीही सार्वजनिक सूचना न देता डिजिटल आवृत्तीतून हा नकाशा हिंदी, इंग्रजी आणि उर्दू आवृत्त्यांमधून हटवला, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचे म्हणणे आहे की, हा निर्णय मनमानी पद्धतीने घेण्यात आला असून तो विद्यार्थ्यांच्या अचूक इतिहास जाणून घेण्याच्या अधिकारावर आणि सांस्कृतिक ओळखीवर आघात करणारा आहे.
याचिकेमध्ये राजे मुधोजी महाराज भोसले (नागपूर), शिवाजीराजे जाधव (सिंदखेडराजा), ऋषिकेश निकम पाटील (छत्रपती संभाजीनगर), रघुजीराजे आंग्रे (अलिबाग), रवींद्र पडवळ (पुणे), कुणाल मालुसरे (पुणे), राम नारायण मराठा, पानिपत (हरियाणा), शरद मोडे (बीड), अथर्व मारणे (पुणे) आदींचा समावेश आहे.







