लोकवाहिनी न्यूज
कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात महाराष्ट्र पॅटर्न पाहायला मिळत असून, राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. ५८ बंडखोर आमदारांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषित केले असून, त्यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष रतिंद्र बोस यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सादर केल्यानंतर त्यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
बंडखोर आमदार ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी आम्हाला जवळपास ५८ आमदारांचे समर्थन असल्याचे दावा करून, त्यांच्या समर्थनाचे पत्र विधानसभाध्यक्षांकडे सोपविले आणि बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली. विधानसभाध्यक्षांनी त्यांची मागणी मान्य केली असून, त्यांच्या गटाला वेगळी मान्यताही प्रदान केली आहे. या गटाने तृणमूल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेतेपद आणि पक्षाच्या अधिकृत चिन्हावरही दावा ठोकण्याची तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे.
बंगालच्या निवडणुकीत टीएमसीने ८० जागा जिंकल्या होत्या. ५८ आमदारांच्या बंडानंतर, ममता बॅनर्जी यांच्याकडे आता फक्त २२ आमदार उरले आहेत. बंडखोर गटाने आपल्या पत्रात ममता बॅनर्जी यांना पक्षाध्यक्ष म्हटले असले तरी, ते अभिषेक बॅनर्जी यांचे नेतृत्व आणि विधिमंडळ पक्षाशी संबंधित निर्णय स्वीकारण्यास तयार नाहीत.
अभिषेक बॅनर्जी यांच्या लेटरहेडवरून अध्यक्षांना एक पत्र पाठवण्यात आले, ज्यात शोभनदेव यांना विरोधी पक्षनेते म्हणून प्रस्तावित करण्यात आले होते. आमदार संदीपन साहा आणि ऋतब्रता बॅनर्जी यांनी तक्रार केली की प्रस्तावावरील त्यांच्या सह्या बनावट आहेत. या तक्रारीनंतर, ममता यांनी दोन्ही आमदारांना पक्षातून काढून टाकले.
नव्या गटातर्फे ऋतब्रता बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. जावेद खान, संदीपन साहा आणि सिउली साहा यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखुझमान यांची मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पक्षांतर्गत बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर, ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सर्व राज्य समित्या आणि संलग्न संघटना तत्काळ प्रभावाने बरखास्त केल्या. आता पक्ष संपूर्ण संघटनेची पुनर्रचना करणार आहे.










