अधिवेशनाची सुरुवातच वादळी; सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलन
लोकवाहिनी न्यूज
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि सातबारा कोरा करावा, अशी मागणी विरोधकांनी केली. नको अटी, नको शर्ती, आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती, अशा घोषणा देत विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारवर निशाणा साधला.
विरोधी पक्षनेते आणि आमदारांनी सरकारच्या कर्जमाफी योजनेवर टीका करत ती अपुरी असल्याचा आरोप केला. विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांचा दौरा हा आधीपासून ठरलेला असून त्याचा कोणत्याही राजकीय घडामोडीशी संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनावेळी सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जमाफी योजनेतील कठोर अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. या अटी तातडीने रद्द कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.










