उद्योगपतींची कर्जे माफ, शेतकऱ्यांची का नाही? म्हणत जीआरची केली होळी
लोकवाहिनी न्यूज
नागपूर: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करून त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा हटविण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी व्हेरायटी चौकात तीव्र आंदोलन करत कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) होळी केली.
यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर शेतकरीविरोधी धोरणांचा आरोप केला. आंदोलनादरम्यान एका बसला अडवून रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत तारेश दुरुलकर आणि विलास सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले तसेच इतर कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणले.
उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्जे माफ करणारे सरकार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज का माफ करत नाही, असा सवाल समितीने उपस्थित केला.
या आंदोलनात समितीचे माजी विदर्भाध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर, सुनील चोखारे, जिल्हाध्यक्ष प्रशांत नखाते, शहराध्यक्ष नरेश निमजे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दौलतकार, संजय चौधरी, श्याम अवथळे, ज्योती खांडेकर, राहुल बनसोड, गिरीश तितरमारे, अलका पोपटकर, डॉ. झेलम कटोच, गणेश शर्मा, विनोद शेंडे, महेंद्र सातपुते, विनायक खोरगडे, तेजराम रेवतकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.










