सायबर ठाण्यातील गैरकारभाराची अखेर विभागीय चौकशी
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : तपास सोडून परस्परांच्या कामामध्ये लुडबूड करत आपल्याच सहकाऱ्यांना हाणामारी करण्यापर्यंत उतरलेल्या सायबर पोलिस ठाण्यातील गैरकारभाराची अखेर विभागीय पोलिस चौकशी केली जाणार आहे. चौकशीवर परिणाम होऊ नये, यासाठी गैरकारभाराचा ठपका ठेवण्यात आलेल्या ९ जणांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. प्रशासन विभागाचे पोलिस उपायुक्त दिपक अग्रवाल यांनी या संदर्भात आदेश जारी केले.
तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार, योगेश घोरे, सहायक पोलिस निरीक्षक विजय राणे, हवालदार सौरभ हिवरकर, श्रीकांत गणोकर, सुनील चनगोले, सतीश वाघ, अजय पवार यांच्यासह राणेकडून मारहाण झालेला हवालदार प्रफुल्ल ठाकरे याचाही समावेश आहे.
गेल्या महिन्याभरापासून शहरातील पोलिस दलात सायबर ठाण्यामधील गैरप्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळली जात आहे. सायबर ठाण्याचे विभाजन झाल्यानंतरही वरिष्ठ पोलिस अधिकारी तपास करण्याचे सोडून परस्परांच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचे प्रकार सातत्याने चव्हाट्यावर येत असताना पोलिस दलाची अब्रू वेशीला टांगली जात होती.
हिरेन भोजवानी नावाच्या तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून या अंतर्गत कलहाला तोंड फुटले होते. हिरेन भोजवानी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, एका बेटिंग ॲपद्वारे त्यांची ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे. या तक्रारीच्या आधारे बळीराम सुतार यांनी गुन्हा दाखल केला. इन्स्पेक्टर योगेश घोरे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास एपीआय विजय राणे यांच्याकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर ठाण्यातील पथक तपासासाठी पुणे येथे गेले. त्या ठिकाणी १४ जणांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. त्यात क्रिकेट सट्टा बेटिंगचे जाळे चव्हाट्यावर आले. एकांश नावाच्या बुकीने वेगवेगळ्या ४० हून अधिक बँक खात्यांमधून हवालाच्या २५० कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार केल्याचे उघड झाल्यानंतरही पथकाने केवळ सूचनापत्रावर त्याला सोडून दिले. त्यामुळे एकांश फरार झाला.
हा प्रकार कळताच दुसऱ्या गटातील सायबर अधिकाऱ्यांनी याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल केली. त्यावरून अंतर्गत कलहाचा भडका उडाला. या प्रकरणात राणे नावाच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाने हवालदार ठाकरेचा भ्रमणध्वनी हिसकावत त्याला मारहाण केली. ठाकरे याने याची तक्रार थेट सह पोलिस आयुक्तांकडे केली. त्या दिवसापासून ठाकरे दोन दिवस बेपत्ता झाला.
सायबर शाखेतील हा प्रकार सातत्याने चव्हाट्यावर येत असल्याने पोलिस दलाची प्रतिमा वेशीला टांगली जात होती. त्याची दखल घेत पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त अग्रवाल यांनी गैरप्रकाराचा ठपका ठेवलेल्या अधिकाऱ्यांसह ९ जणांच्या विभागीय चौकशीचे आदेश जारी केले. चौकशीवर परिणाम होऊ नये यासाठी या ९ जणांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.








