लोकवाहिनी न्यूजमुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाभावी पिकांचे नुकसान होत असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दुष्काळ जाहीर करण्यापासून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनासाठी मदत देण्यापर्यंतच्या विविध मागण्या त्यांनी पत्रातून मांडल्या आहेत.
शरद पवारांच्या प्रमुख मागण्या
शरद पवार यांनी राज्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. ज्या तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे, त्यांना दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त घोषित करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी. तसेच शेतमजूर कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची विशेष मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना तातडीने लागू करावी आणि त्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असे पवार यांनी सुचवले आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून एक लाख रुपये करावे. २०२५-२६ मध्ये पीककर्ज घेऊन यंदा थकीत झालेल्या शेतकऱ्यांशाही कर्जमाफी योजनेत समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी
एक रुपयातील पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून, पूर्वी वगळण्यात आलेले शेतकरीहिताचे ट्रिगर पुन्हा लागू करावेत. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी जाहीर केलेली हेक्टरी १७ हजार रुपयांची मदतही तातडीने वितरित करावी, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
रोजगारासाठी उपाययोजनांची मागणी
दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेतून विशेष कामे सुरू करावीत. जलसंधारण, शेतीशी संबंधित कामे आणि इतर रोजगार उपलब्ध करून द्यावा. फळबागा वाचवण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पाणीटंचाई असलेली गावांचे सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार सरकारी टँकर सुरू करावेत. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. पशुधनाला पिण्याचे पाणी आणि पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असेही पवार यांनी सुचवले आहे.
फडणवीसांची भूमिका
दरम्यान, शरद पवारांच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी पत्राद्वारे काही सूचना केल्या आहेत. ही चांगली गोष्ट असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या पत्राला कोणताही राजकीय रंग देणार नसल्याचे स्पष्ट करत, सरकारने यापूर्वीच नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आवश्यक निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. पवार यांनी यापुढे आणखी काही सूचना किंवा सल्ले दिल्यास ते निश्चितपणे ऐकून घेऊ, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.














