लोकवाहिनी न्यूज,नागपूर : राष्ट्रीय विचार आणि देशभक्तीची भावना समाजात, त्यातही विशेषतः ग्रामीण भागात रुजवण्याची आज खरी गरज आहे. सकारात्मक विचारांची पेरणी करून समाजमन घडवण्याची आज आवश्यकता असून त्यासाठी पत्रकारांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स’ (NUJ) विदर्भाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे शिष्टमंडळ आज नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी गेले असता ते बोलत होते. राष्ट्रहित जोपासणाऱ्या आणि देशाला परमवैभवाकडे नेणाऱ्या संस्था, संघटनांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांनी सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्व. भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटरमार्फत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देखील गडकरी यांनी यावेळी दिले. नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स विदर्भाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स विदर्भाचे अध्यक्ष अविनाश पाठक यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने यावेळी गडकरी यांना पत्रकारांच्या विविध समस्यांचे निवेदन देऊन त्याबाबत अवगत केले. संघटना पत्रकारांसाठी आणि समाजासाठी कोणकोणते उपक्रम राबवू इच्छिते, याबाबात देखील पदाधिकाऱ्यांनी गडकरींना माहिती दिली. याप्रकरणी देखील शक्य ते सर्व सहकार्य करू, असेही गडकरी यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात अध्यक्ष अविनाश पाठक यांच्यासह सचिव पराग जोशी, उपाध्यक्ष चारुदत्त कहू, अजिंक्य भांडारकर, स्नेहल जोशी, मीरा टोळे, नितीन कुलकर्णी प्रभृती कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.










