नागपूर : “विनम्रता, संयम आणि संवेदनशीलता हे आदर्श कार्यपद्धतीचे अविभाज्य घटक आहेत. अधिकारी म्हणून आपली जबाबदारी केवळ नियमांची अंमलबजावणी करणे नाही, तर प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे ही आहे. न्याय, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या आधारावर घेतलेले निर्णय शासन व्यवस्थेला मजबूत करण्यासह देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देतात,” या शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या अधिकाऱ्यांना साद घालत भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटीची) ७८ व्या तुकडीच्या दीक्षान्त समारंभात त्या आज बोलत होत्या. एनएडीटीच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल, महासंचालक सी.व्ही. पवन कुमार, प्रशासकीय सदस्य पंकज कुमार मिश्रा व अन्य मान्यवर उपस्थित होते.
“आपण देशाच्या आर्थिक प्रगतीचे, सामाजिक न्यायाचे आणि सुशासनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहात. आगामी काळात आपण डिजिटल अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यवहाराची गुंतागुंत आणि करचुकवेगिरीच्या नव्या पद्धती अशा आव्हानांना सामोरे जाल. या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक आहे. डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपल्या क्षमतेना अधिक बळकट करतील; मात्र तंत्रज्ञान हे केवळ साधन आहे. आपली खरी ओळख आपला विवेक, प्रामाणिकता आणि नैतिक दृष्टिकोन यात आहे, हे अधिकाऱ्यांनी सतत लक्षात ठेवावे,” असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.








