परतवाडा : अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्याच्या प्रकरणात अचलपूर येथील आरोपी अयाज अहमद याच्या घरावर ‘बुलडोजर’ कारवाई करण्यात आली. त्याच्या घराचा काही भाग अतिक्रमित असल्याने नगर परिषदेने घराचा जिना तोडून टाकला. या कारवाईदरम्यान, प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लोकांनीही मोठी गर्दी केली होती.
अचलपूर नगर परिषदेचे पथक बुलडोजर घेऊन आरोपीच्या घरासमोर पोहोचले. जेसीबीच्या माध्यमातून घराच्या बाजूला लावण्यात आलेला लोखंडी जिना तोडण्यात आला. कारवाई दरम्यान भाजपचे आमदार प्रवीण तायडे स्वतः हजर होते. अशा प्रकारे बुलडोजरच्या साहाय्याने आरोपीच्या घरावर कारवाई करण्याची अचलपूरमधील ही पहिलीच घटना होय.
अचलपूर नगरपरिषदेकडून संबंधित घरावरील अतिक्रमणाबाबत तपास केल्यानंतर, काही भाग बेकायदेशीररीत्या बांधण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर नगरपरिषदेने आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार आज बुलडोजरद्वारे कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या घराजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या गंभीर प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी एकत्रित येत निषेध व्यक्त केला.








