नागपूर : आखाती देशांमध्ये चाललेल्या युद्धाचा फटका आता महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांना बसताना दिसत आहे. युद्धाचा परिणाम बांधकाम साहित्यावर झाल्याने पूर्वीच्या शासन प्रचलित दरानुसार शासनमान्य कंत्राटदारांना शासनाकडून मिळत असलेले बांधकाम परवडत नसल्यामुळे, ही बाब शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी बुधवार, १५ एप्रिलला राजेश सोनोने (किंवा सोनटक्के), कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांना बांधकामाच्या दरात वाढ करून देण्याच्या मागणीचे निवेदन काँट्रॅक्टर अँड बिल्डर्स असोसिएशन विदर्भचे अध्यक्ष डॉ. प्रवीण महाजन यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे, विशेषतः अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या मालाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, याचा थेट परिणाम एचडीपीई (HDPE) पाईप, डिझेल-पेट्रोल, लोखंड, सिमेंट, रेती, गिट्टी आणि वाहतूक दरावर झाला आहे. सद्यस्थितीत एचडीपीई पाईपचे बाजारभाव युद्धपूर्व दराच्या तुलनेत सुमारे ६० ते ७० टक्क्यांनी वाढले असून इतर बांधकाम साहित्याचे दर ३५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत.
महामंडळाच्या निविदेत सादर केलेले दर हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या प्रचलित दरापेक्षा निविदेतील दर कमी आहेत, ही बाब नाकारता येणार नाही. मात्र, सध्याच्या अनपेक्षित दरवाढीमुळे सिंचन क्षेत्रातील बांधकाम आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे.
तसेच, महामंडळाच्या अंदाजपत्रकात धरलेले दर व सध्याचे बाजारभाव यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. यामुळे सदर काम सुरळीतपणे व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी दरवाढ मिळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा वाढलेल्या खर्चामुळे बांधकामावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. करिता बाजारभावातील सद्यस्थितीचा विचार करून बांधकाम साहित्यावर बाजारभावानुसार दरवाढ मंजूर करावी, जेणेकरून काम नियोजित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने सहज पूर्ण करता येईल. या महत्त्वपूर्ण बाबीवर आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन आज कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांना देण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य ज्योती खांडरेकर, रामराव मुसळे, प्रशांत चाफले, बी.सी. नायर, दीपक मगर, आरगडे, संजय शर्मा, पीयूष मुसळे, मोहन नायर, अनिरुद्ध मंडले, रोशन खंगार, नीरज महाकाळ, रावत इत्यादी सदस्य उपस्थित होते.








