लोकवाहिनी न्यूज,मुंबई : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत सातत्याने बोलले जात आहे, त्याबद्दल शासनावर बोटही ओढले जात आहे. पण समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई अंतर हे ८ तासांपर्यंत कमी झाल्यामुळे, पैसा आणि श्रमाची बचत होत असून, या मार्गाने उत्पन्नाच्या बाबतीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने नागपूर ते मुंबई दरम्यानचा केवळ प्रवासाचा वेळच वाचवला नाही, तर राज्याच्या तिजोरीतही मोठी भर घातली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या महसुलात तब्बल १,२४०.०४ कोटींची भर पडली आहे. या मार्गावरून गेल्या वर्षात तब्बल १.५५ कोटी वाहनांनी प्रवास केल्याने टोल वसुलीतून हा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार, समृद्धी महामार्गाची लोकप्रियता आणि वापर दिवसेंदिवस वाढत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षातील १,२४० कोटींची वसुली ही मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ४९९.९१ कोटी रुपयांनी जास्त आहे. महामार्ग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असताना, पहिल्यांदाच वार्षिक टोल संकलनाने १००० कोटींचा टप्पा पार केला आहे, जे या प्रकल्पाच्या यशाचे मोठे निदर्शक मानले जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीच्या काळापासूनचा विचार केल्यास, आतापर्यंत एकूण ३.४४ कोटी वाहनांनी या मार्गाचा वापर केला आहे. यातून आतापर्यंत एकूण २,६६० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.








