काँग्रेससह मित्रपक्षांचा पाठिंबा, राज्यपालांची घेणार भेट
लोकवाहिनी न्यूज,चेन्नई : टीव्हीके नेते जोसेफ विजय यांनी अखेर बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा गाठला असून, त्यांना काँग्रेसच्या पाच आमदारांसह व्हीसीके, सीपीएम आणि सीपीआयच्या प्रत्येकी दोन आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. या पक्षांच्या समर्थनामुळे ते बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ जागांच्या जादुई आकड्यापर्यंत पोहोचले आहेत.
तमिळनाडूमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेवरून आज दुपारपर्यंत राजकीय ओढाताण कायम होती. दरम्यान, बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचल्यामुळे तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) प्रमुख जोसेफ विजय लवकरच राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेणार आहेत. सरकार स्थापनेतील पेच सोडवण्यासाठी आणि बहुमत सिद्ध करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांच्यासोबत त्यांची ही तिसरी भेट असणार आहे. यापूर्वी बुधवारी आणि गुरुवारीही दोघांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, त्या दोन्ही वेळा आर्लेकर यांनी विजय यांच्या सरकार स्थापनेच्या दाव्याला नकार देत, टीव्हीकेकडे बहुमतासाठी आवश्यक पाठिंबा नसल्याचे सांगितले होते.
विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघमने गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत दमदार कामगिरी केली. पक्षाने पहिल्याच निवडणुकीत २३४ पैकी १०७ जागा जिंकत द्रविड राजकारणातील दिग्गज पक्ष डीएमके आणि एआयएडीएमके यांचे तमिळनाडूमधील तब्बल ६२ वर्षांचे वर्चस्व मोडून काढले. यापूर्वी काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडून विजय यांना पाठिंबा देणारे पत्र सादर केले होते. काँग्रेसकडून तमिळनाडूमधील इतर प्रादेशिक पक्षांनाही विजय यांच्या टीव्हीकेसोबत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे, टीव्हीकेकडूनही अशाच प्रकारचे प्रयत्न करण्यात येत होते.








