लोकवाहिनी न्यूज,कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून, भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदु अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ते पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे आता निश्चित झाले असून, उद्या, शनिवार, ९ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. निवड झाल्यानंतर शुभेंदु अधिकारींनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला.
अमित शाहंच्या उपस्थितीत ऐतिहासिक निवड
कोलकाता येथे पार पडलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत शुभेंदु अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांनी एकमताने अधिकारी यांच्या नेतृत्वाला पसंती दिली. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होत असून, अधिकारी यांची निवड ऐतिहासिक मानली जात आहे.
ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त
राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. तत्पूर्वी, ७ मे रोजी पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी १७ वी विधानसभा विसर्जित केली होती, ज्यासोबतच ममता बॅनर्जी यांचे सरकारही अधिकृतपणे बरखास्त झाले. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता, मात्र विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने राज्यपालांनी घटनात्मक पाऊल उचलत विधानसभा बरखास्त केली. यामुळे आता शनिवारपासून बंगालमध्ये शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नवे पर्व सुरू होणार आहे.
अधिकारी यांच्या निवडीमागील महत्त्वाची कारणे
शुभेंदु अधिकारी यांना मुख्यमंत्रीपद देण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा सलग दोनवेळा पराभव केला. २०२१ मध्ये नंदीग्राममध्ये आणि यंदाच्या निवडणुकीत थेट ममतांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भवानीपूरमध्ये जाऊन त्यांना धूळ चारल्याने अधिकारी यांचा दबदबा वाढला होता.








