पालकमंत्रींचे नागरिकांना जलसंपत्तीच्या रक्षणाचे आवाहन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर शहरातील तलावांच्या संवर्धनाबाबत यापूर्वी दोन बैठका झाल्या आहेत. नागपूरला पाणीटंचाईपासून दूर ठेवायचे असेल, तर शहरातील जलस्त्रोतांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही गराटाचे किंवा सांडपाण्याचे पाणी सार्वजनिक जलस्त्रोतांमध्ये सोडू नये. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. भोसले राजांनी नागपूरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तलावांची निर्मिती केली. त्यामुळे या ऐतिहासिक जलसंपत्तीचे जतन करणे ही प्रत्येक नागपूरकराची जबाबदारी आहे. तलावांचे खोलीकरण आणि स्वच्छता करण्याची गरज आहे. नागपूरच्या सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
बावनकुळे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते बोलत होते. संभाव्य पाणी टंचाईवर ते म्हणाले, तोतलाडोह धरणातील पाणी पुढील आठ महिने पुरेल, असे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी येथून पाणी सोडण्याचा प्रश्न नाही. कोराडी आणि खापरखेडा औषष्णिक वीज प्रकल्पांसाठी पाण्याचे आरक्षण कमी करण्यात आले असून, हे दोन्ही प्रकल्प सांडपाण्यावर चालविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बोअरवेलवरील बंदी उठवली
बोअरवेल खोदण्यावरील बंदी उठवण्यात आली असून, जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर उद्या यासंदर्भात आवश्यक दिशा-निर्देश जारी करतील. शेतकऱ्यांची झाडे वाचविणे महत्त्वाचे आहे. विशेषतः संत्रा आणि मोसंबीच्या बागा पाण्याअभावी वाळू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातही बोअरवेलवरील बंदी उठवण्याबाबत कार्यवाही केली जाईल. फळबागा वाचविण्यासोबतच भूजल पातळी वाढविण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य, त्यांचा संघर्ष, त्यांचे विचार आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी दिलेला लढा देशभर पोहोचवण्यात येणार आहे. आदिवासी समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा सप्ताह प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील भाजपनेविषयच्या उल्लेखावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यामुळे त्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सकारात्मक लिहिणार नाही, हे स्वाभाविक आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर जनतेसमोर जाण्याऐवजी पुस्तकांच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करून काही दिवस बातम्यांमध्ये राहण्याची काँग्रेसची जुनी पद्धत आहे. या पुस्तकातील मुद्द्यांचे छोटे-छोटे व्हिडिओ, ग्राफिक्स तयार करून वेगवेगळ्या समाजघटकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र, देशातील जनता विकसित भारताच्या मॉडेलकडून पसंती देत आहे. आगामी निवडणुकीची तयारी काँग्रेसने या पुस्तकाच्या माध्यमातून सुरू केली आहे, अशी टीका त्यांनी केली.

















