मानसी पांडे सामनावीर आणि मालिकावीर
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : महिलांना क्रीडा क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या क्रीडागुणांना वाव देणे आणि उच्च स्तरावर खेळण्याची संधी मिळावी, या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांच्या पुढाकारातून महिला खेळाडूंसाठी ‘महापौर चषक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यशवंत स्टेडियम येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महापौर ११ संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत जेतेपद पटकावले. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका पूजा पाठक, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, जितेन्द्र गायकवाड, शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धेत शहरातील ८ संघांच्या एकूण १२० महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. संघांची अ आणि ब अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. अंतिम सामन्यात महापौर ११ संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मानसी पांडे हिच्या ४८ चेंडूंत नाबाद ९३ धावांच्या जोरावर २० षटकांत ५ गडी गमावून १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरत एम. एच. सी. सी. मास्टर ११ संघाला कु. अंकिता भोंगाडे हिच्या ५४ चेंडूंत ९१ धावांतही २० षटकांत ८ गडी गमावून १६५ धावाच करता आल्या. त्यामुळे महापौर ११ संघाने १७ धावांनी विजय मिळवत जेतेपद पटकावले. गोलंदाजीत महापौर ११ संघाच्या अदिती पालांदूरकरने ४ षटकांत २४ धावा देत ४ गडी बाद करून प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का दिला. खुशी जंजाळणे २, रुक्सार अंसारी आणि खुशी भगतने प्रत्येकी १ गडी बाद केला. एम. एच. सी. सी. मास्टर ११ संघाकडून सिद्धी नेरकर, मुस्कान ठाकूर आणि रितिका ठाकूर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तसेच अंकिता भोंगाडे, देव हिरापुरे आणि सिद्धी नेरकर यांच्या चपल क्षेत्ररक्षणामुळे प्रतिस्पर्धी संघाचे दोन खेळाडू धावबाद झाले.
बक्षीस वितरण समारंभान प्रवीण दटके यांनी महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ व संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागपूर महानगरपालिकेचे कौतुक केले. भविष्यातही अशा स्पर्धांच्या माध्यमातून महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
विजेयी संघास रोख पारितोषिके
-
विजेत्या महापौर ११ संघास जेतेपदाचा चषक व १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, तर उपविजेत्या एम. एच. सी. सी. मास्टर ११ संघास ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
-
महापौर ११ संघाची मानसी पांडे सामनावीर आणि मालिकावीर ठरली.

















