जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांतीकारीचा हल्लाबोल
लोकवाहिनी न्यूज
बुलडाणा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्या, सरसकट कर्जमाफी करा, अशा मागण्यांसाठी आज, २८ सप्टेंबर रोजी बुलढाण्यात क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. दरम्यान, रविकांत तुपकरांसह आंदोलककर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाने परिसर दणाणून सोडला. डफडे वाजवत, सरकारविरोधी घोषणा देत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडत वाळलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर उधळल्या. आमदार-खासदार, सचिव कलेक्टरांचे पगार थांबवा, आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी मांडली. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मात्र, आंदोलकांनी डफडे वाजवत आणि सरकारविरोधी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांच्या हातात हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या, सरसकट कर्जमाफी करा, अशा मागण्यांचे फलक होते. करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर उधळून शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी जीआरवर रविकांत तुपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सरकारचे आश्वासने फालतू आणि तकलादू आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी असे जीआर काढू नका, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी शासनाच्या दुष्काळी जीआरच्या प्रती फाडून निषेध नोंदवण्यात आला. सोयाबीन उत्पादनासाठी हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला असून, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने आपल्या खर्चाच्या प्राधान्यक्रमात बदल करावा, अशी भूमिका तुपकर यांनी मांडली. राज्यातील मोठे प्रकल्प काही काळ थांबवून त्यांचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा. आमदार-खासदारांचे पगार थांबवा आणि हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलन तीव्र होत असतानाच पोलिसांनी बळाचा वापर करून रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी वडगाववरून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात नेले. रविकांत तुपकर यांना शहर पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले.













