बुलढाणा : समृद्धी मार्गावरील अपघातांची ही दुर्दैवी मालिका आजही कायम आहे. चालू वर्षातही वाहन दुर्घटनांचे हे सत्र कायम असल्याचे चित्र आहे. याच मालिकेत आज शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी समृद्धीवर विचित्र अपघाताची नोंद झाली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ९ वाहनांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली. यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. यामुळे समृद्धी मार्गावर दोन्ही बाजूना वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्या. यामुळे प्रामुख्याने शेकडो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. मालवाहक वाहन चालकांना मोठा मनस्ताप झाला.
समृद्धी महामार्गावर दसरखेडजवळ भीषण अपघाताची घटना घडली. एका ट्रकने पुढील मोठ्या वाहनाला जोरदार धडक दिली. यापरिणामी मागून येणारी भरधाव वाहने एकमेकांवर आदळली. या साखळी अपघातात तब्बल ८ ते १० वाहने एकमेकांवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला असून काही वाहने एकमेकांवर उलटल्याचे प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवरही गंभीर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, दुसरबीड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी अपघात स्थळी दाखल झाले. मदतकार्य आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू झाले.
अपघातात नेमकें किती जन जखमी झाले याबाबत अधिकृत माहिती अध्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र सुदैवाने जीवित हानी टळली. दरम्यान, समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे पालन आणि वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

















