फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, शिंदेंचे कौतुक
लोकवाहिनी न्यूज:मुंबई : आत्ताचे डिलिंग जास्त सोपे आहे. प्रॅक्टिकल लोक आहेत. त्यांच्याशी चर्चा करता येते. फोन बंद करून किंवा दरवाजा बंद करून बसणारे आत्ताचे नेते नाहीत. त्यामुळे आत्ताच्या शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणे सोपे आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला असून, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले आहे.
झी २४ तास महाराष्ट्र गौरव २०१६ या कार्यक्रमात झालेल्या विशेष मुलाखतीदरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेतील फूट, २०१९ मधील राजकीय घडामोडी आणि सध्याच्या सत्तासमीकरणांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, पूर्वी काही नेते संवाद टाळत होते, फोन बंद ठेवायचे, दरवाजे बंद करून बसायचे, असे म्हणत थेट टोला हाणला. फडणवीस यांनी पुढे बोलताना सांगितले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत संवाद अधिक सुलभ झाला आहे. आता जे नेते आहेत, ते व्यवहार्य विचार करणारे आहेत. त्यांच्याशी चर्चा करता येते, संवाद साधता येतो. दिल्लीला जाऊन चर्चा करणे हे कोणतेही गैर नाही, असे ते म्हणाले. राज्याच्या विकासाशी संबंधित प्रश्न, साखर उद्योग, कांदा उत्पादकांचे प्रश्न यासाठी केंद्राशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, आत्ताच्या शिवसेनेतील नेते अधिक प्रॅक्टिकल आहेत. निर्णय प्रक्रियेत संवाद साधण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे सध्याच्या सत्तेतील सहकार्य अधिक सोपे आणि परिणामकारक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या या विधानामागे २०१९ मधील राजकीय घडामोडींचा संदर्भ असल्याचे मानले जात आहे. त्या काळात शिवसेना आणि भाजप यांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांनंतर दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते.
या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. २०१९ मध्ये चर्चेच्या प्रयत्नांसाठी फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही, असा दावा त्यांनी याआधीही विविध मुलाखतींमध्ये केला होता. त्याच संदर्भाला जोड देत सध्याच्या वक्तव्यात त्यांनी पुन्हा अप्रत्यक्ष टीका केली आहे. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत मोठा राजकीय भूकंप घडवला होता. त्यानंतर शिवसेना दोन गटांत विभागली गेली. सध्या उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासोबत आहेत, तर एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत सत्तेत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा ठाकरे-शिंदे-भाजप या तिन्ही गटांतील राजकीय संबंधांवर चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या टिप्पणीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) काय प्रतिक्रिया देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










