४ जूनला वाढदिवशी भविष्यातील वाटचालीबाबत घोषणा
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी आज, मंगळवारी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या अण्णामलाई यांनी भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांना ५ पानी राजीनामा सोपवल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अण्णामलाई यांनी २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०२१ ते २०२५ या काळात त्यांनी तामिळनाडू भाजपचे नेतृत्व केले. या काळात त्यांनी व्यापक जनसंपर्क मोहिमा राबवून राज्यात पक्षाला बळकटी दिली तसेच युवा मतदार आणि सोशल मीडियावर मोठा प्रभाव निर्माण केला. परंतु, २०२६ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अण्णामलाई आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले. अण्णामलाई यांनी सोमवारी त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत विचारले असता त्यांनी “कृपया थांबा, आम्ही दोन दिवसांत बसून चर्चा करू,” असे सांगितले होते. ४ जून रोजी त्यांचा वाढदिवस असून त्यापूर्वी चेन्नईच्या प्रमुख रस्त्यांवर आणि गल्लीबोळात “आमचे नेते, या आणि आमचे नेतृत्व करा” अशा घोषणा लिहिलेले पोस्टर्स दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर अण्णामलाई यांनी आज, मंगळवारी दिल्लीत जाऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांना राजीनामा सोपवला. मिळालेल्या माहितीनुसार, माजी आयपीएस अधिकारी अण्णामलाई हे एका नवीन प्रादेशिक राजकीय पक्षाची स्थापना करण्याच्या विचारात आहेत.










