समाजातील जुनाट रूढी, परंपरा आणि स्त्रियांविषयी असलेल्या भेदाभावावर आधारित कथा नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवतात. अशाच एका प्रेरणादायी कथेच्या रूपात येत आहे नवी मालिका कृष्णाईच्या लेकी, जी १५ जूनपासून संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका एका खंबीर आई कृष्णाई आणि तिच्या मुलींच्या संघर्षाची आणि आत्मविश्वासपूर्ण प्रवासाची कहाणी सांगते.
कृष्णाईची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. तिला तीन मुली झाल्या आणि मुलगी होण्यामुळे तिच्या पतीने दुसरे लग्न केले. समाज आणि कुटुंबाने तिला कमी लेखले, तरीही कृष्णाईने हार मानली नाही. तिने आपल्या मुलींना शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वास दिला. ही कथा सांगते की, मुलगा नसल्यामुळे स्त्रीचे मूल्य कमी होत नाही; मुलीही समाजात तितक्याच सक्षम आहेत. कथेचा मुख्य भाग म्हणजे कृष्णाईच्या तीन मुलींचा प्रवास, मोठी मुलगी शारदा शांत, संयमी आणि समजूतदार आहे. मधली मुलगी गौरी बंडखोर स्वभावाची असून, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य तिच्यात आहे. लहान मुलगी सौदामिनी स्वप्नाळू, महत्त्वाकांक्षी आणि करिअरकेंद्रित आहे. मुलींना समाजातील रूढी, कुटुंबाचे दबाव, लग्नाच्या अपेक्षा आणि करिअरमध्ये येणारी अडचणी यांचा सामना करावा लागतो. पण कृष्णाई प्रत्येक वेळेस त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करायला शिकवते. ही मालिका मुलींच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरतेवर भर देते.
कृष्णाईच्या लेकी ही फक्त कौटुंबिक नाटक नाही, तर स्त्रीशक्ती, स्वाभिमान, नात्यांतील भावना आणि समाजातील बदल यांवर आधारित एक प्रेरणादायी कथा आहे. कृष्णाईचा संदेश स्पष्ट आहे, मुलगी ही घराची ओझे नाही, तर आधारस्तंभ आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि स्वाभिमान जपण्याचे हे मूल्य ती आपल्या मुलींना देत आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ कृष्णाईच्या भूमिकेत झळकतील. त्यांच्या अभिनयातून खंबीर आईचा संघर्ष प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. त्यांच्यासोबत ट्बीकल यादव, रोहित परशुराम, स्मिता सरवदे, संजय कुलकर्णी, साक्षी गांधी आणि एकता लब्दे यांसारखी कलाकारांची दमदार फळी दिसणार आहे. कथा तेजेश घाटगे यांनी लिहिली असून, दिग्दर्शन अनिकेत साने करणार आहेत. ओशन फिल्म्स या मालिकेची निर्मिती करत आहेत. १५ जूनपासून संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर या मालिकेतून प्रेक्षक कृष्णाई आणि तिच्या मुलींच्या प्रेरणादायी प्रवासाचा अनुभव घेऊ शकतात.









