लोकवाहिनी न्यूज मुंबई : प्रसिद्ध निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाचे (सेन्सॉर बोर्ड) माजी अध्यक्ष, पहलाज निहलानी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. कठोर भूमिका आणि स्पष्टवक्तेपणासाठी ते ओळखले जात. सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयांची आजही चर्चा होते.
पहलाज निहलानी यांनीच गोविंदाला चित्रपटसृष्टीत आणले आणि त्याला सुपरस्टार बनवले. त्यांनी १९८६ साली ‘इल्जाम’ या चित्रपटातून त्याला लाँच केले. पहलाज यांना गोविंदाचा लूक आवडला नसला तरी, त्याच्या नृत्यकौशल्याने आणि ॲक्शन कौशल्याने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी गोविंदाला मुख्य अभिनेता म्हणून लाँच केले. त्यांनी केवळ गोविंदालाच स्टार बनवले नाही, तर चंकी पांडेलाही लाँच केले. इतकेच नाही, तर ९० च्या दशकात, अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करणाऱ्या दिव्या भारतीलाही पहलाज निहलानी यांनी सुपरस्टार बनवले.









