१२ जागांवर सत्ताधारी-विरोधी पक्षात चुरस रंगणार
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जूनला मतदान होणार आहे. तथापि, आज (गुरुवारी) अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी महायुतीचे तब्बल ६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याने महायुतीमध्ये टेंशनचे वातावरण होते मात्र बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आले. तथापि, नाशिकमध्ये महायुतीमधील बंडखोरी कायम आहे.
ठाणे, कोकण, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या ६ जागांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, कोकण मतदारसंघात अनिकेत तटकरे, यवतमाळ शिंदे सेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघात भाजपाचे अरुण लखानी, पुणे मतदारसंघात विक्रम काकडे आणि अहिल्यानगर मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे निवडून आले आहेत.
कोकणात हायव्होल्टेज ड्रामा
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सर्वात जास्त चर्चा रंगली ती बाळ माने यांच्या माघारीची. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने चक्क भाजप नेते नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचले. या धक्कादायक प्रकारानंतर बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
नाशिक आणि पुण्यात काय घडले?
पुण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने विक्रम काकडे बिनविरोध निवडून आले. दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र पेच कायम आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यासमोर भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी आपले आव्हान कायम ठेवल्याने येथे आता चुरशीची लढत होणार आहे. नाशिकचा हा मतदारसंघ महायुतीसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.
१२ जागांवर आता आमने-सामने लढत
बिनविरोध जागा वगळता आता उर्वरित १२ जागांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नागपूर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी महायुती आणि मविआचे दिग्गज नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अनेक ठिकाणी अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
अर्चना गंगणे यांची माघार
तुळापूरचे भाजपचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या पत्नी अर्चना गंगणे यांनी धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीसाठी बंडखोरी केली होती. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात भाजपकडून बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख यांच्यामध्ये लढत होणार आहे.











