‘नेटिव्ह प्लांट्स ॲंड इकोसिस्टम मिनीकॉन’चा समारोप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वनस्पती आणि वन्यजीव यांचे संवर्धन अत्यंत आवश्यक असून जैवविविधतेचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन एनआयएसएम (भारत सरकार)चे चेअरपर्सन पीडीजी राजे संग्रामसिंह भोसले यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटतर्फे ‘नेटिव्ह प्लांट्स ॲंड इकोसिस्टम मिनीकॉन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सीताबर्डी येथील फॉर्च्युन मॉलमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटच्या अध्यक्षा ज्योत्स्ना पंडित होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मनीषा उपेंद्र कोठेकर उपस्थित होत्या. तसेच एनआयएसएम (गव्हर्नमेंट ऑफ इंडिया)चे चेअरपर्सन पीडीजी राजे संग्रामसिंह भोसले, रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या सचिव विशाखा पवार आणि सीएसएनएमचे संचालक डॉ. अरविंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी एनआयएसएम (गव्हर्नमेंट ऑफ इंडिया)चे चेअरपर्सन पीडीजी राजे संग्रामसिंह भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छता यांचा परस्परांशी घनिष्ट संबंध असल्याचे सांगताना संग्रामसिंह भोसले यांनी वन्यजीव आणि वनस्पतीचे संवर्धन न झाल्यास पर्यावरणीय असमतोल निर्माण होऊन त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो, असे नमूद केले.
रोटरीसारख्या सामाजिक संस्थांनी जनजागृती, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी अध्यक्षा ज्योत्स्ना पंडित यांनी आपल्या मनोगतात मोठी स्वप्ने पाहण्यापेक्षा प्रत्येकाने छोट्या-छोट्या कृतींमधून पर्यावरण संरक्षणासाठी योगदान दिल्यास येत्या पाच वर्षात सर्वत्र हिरवेगार वातावरण पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. नेटिव्ह प्लांट्समुळे पक्षी, कीटक तर येतातच शिवाय जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. या संदर्भात जनजागृती करण्यासाठी दर तीन महिन्याला उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अलका चतुर्वेदी, समित अदमाने, अंबरीश घटाटे, सचिन द्रवेकर आणि धीरज झाडे आदी मान्यवर वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केले. समारोपीय भाषण डॉ. मनीषा कोठेकर यांनी केले. आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या सचिव विशाखा पवार यांनी केले.









