लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर शहरात आगामी सणांच्या काळात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ‘भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) २०२३’च्या कलम १६३ अंतर्गत डॉल्बी साऊंड सिस्टीम, प्लाज्मा साऊंड सिस्टीम, प्रेशरामिड साऊंड सिस्टीम आणि यासाठी वाहनांमध्ये केलेल्या बेकायदेशीर बदलांवर कडक बंदी घातली आहे. ही बंदी संपूर्ण शहरात ३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०० पासून ते १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ पर्यंत लागू राहील.
राज्यात मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीम आणि डीजेवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे. नुकतेच, पुणे पोलिसांनी मोठ्या आवाजातील डीजेवर बंदी घातली. यानंतर, भाजप नेते आणि माजी आमदार संदीप जोशी यांनीही बंदीची मागणी केली. त्यांनी या संदर्भात एक जनआंदोलनही सुरू केले आहे.
पोलिस आयुक्तालयाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, शहरात गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्न्हा पोळा, हजरत ताजुद्दीन बाबा २६ वे वर्ष, गणेशोत्सव, दुर्गा पूजा (मूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक) आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांसारखे प्रमुख धार्मिक आणि सामाजिक उत्सव साजरे केले जाणार आहेत. या कार्यक्रमांदरम्यान आणि विसर्जन मिरवणुकांच्या वेळी, विविध गट आणि डीजे ऑपरेटर्स डॉल्बी साऊंड (टॉप, मिड, बास मल्टीस्पीकर्स), प्लाज्मा आणि प्रेशरामिड सिस्टीमच्या अनेक स्तरांचा वापर करून वाहनांवर भव्य ‘साऊंड वॉल’ उभारण्याची शक्यता आहे.
या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की, कानठळ्या बसवणाऱ्या आणि बहुस्तरीय ध्वनी प्रणालीमुळे अनेकदा उत्सव समितीचे सदस्य, राजकीय संघटना आणि पोलिस प्रशासन यांच्यात वाद आणि तणाव निर्माण होतो, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. शिवाय, अशा प्रणाली पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० द्वारे निर्धारित डेसिबल मर्यादेचे उघडपणे उल्लंघन करतात, ज्यामुळे नागरिक आणि प्रसारमाध्यमांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटतात. याव्यतिरिक्त, स्पीकर बसवण्यासाठी वाहनांमध्ये केलेले बेकायदेशीर बदल रस्ते अपघातांचा गंभीर धोका निर्माण करतात.
नियमांचे पालन करणाऱ्यांसाठी सूट
पोलिस प्रशासनाने आदेशात हे देखील स्पष्ट केले आहे कि, पर्यावरण नियमांनुसार निर्धारित केलेल्या कायदेशीर आवाजाच्या मर्यादित चालणाऱ्या सामान्य ध्वनी प्रणालींना ही बंदी लागू होणार नाही. आदेशाच्या प्रती शहरातील सर्व प्रमुख स्थळे, पोलिस ठाणी आणि सार्वजनिक माध्यमांवर प्रसारित केल्या जात आहेत, जेणेकरून उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीत दंडात्मक कारवाई करता येईल.
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व साऊंड सिस्टीम ऑपरेटर, वाहन मालक आणि दहीहंडी, पोळा, गणेशोत्सव, दुर्गा पूजा व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आयोजकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, त्यांनी त्यांच्या सर्व डॉल्बी, प्लाज्मा आणि प्रेशरामिड सिस्टीम, तसेच त्यांच्यासाठी बदल केलेली कोणतीही वाहने सीलबंद ठेवावीत आणि या संपूर्ण कालावधीत कोणत्याही परिस्थितीत त्या चालवू नयेत.










