नागपूर : नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या पिवळी मारबत उत्सवाच्या तांडापेठ येथील मंडपाला शुक्रवार रोजी प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे व सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहलता तरडे यांनी सदिच्छा भेट दिली.
महापौर नंदा ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपिन यांच्यासह क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांच्या देखरेखीत मारबत व बडग्या महोत्सवाची तयारी केल्या जात आहे. स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्या संकल्पनेतून मनपाच्या मारबत महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. त्यातच एक भाग म्हणून राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना महोत्सवासाठी निमंत्रित केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अभिनेते प्रवीण तरडे यांनी पिवळ्या मरबत मंडळाला सदिच्छा भेट दिली.
भेटीदरम्यान क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, नगरसेवक संतोष (रामभाऊ) अंबुलकर तसेच नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि मारबत उत्सवाशी संबंधित पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. तांडापेठ येथील नागोबा मारबत देवस्थान तर्हाणे तेली समाजाच्या वतीने दरवर्षी पिवळी मारबत उत्सवाचे आयोजन करण्यात येते. नागपूरच्या समृद्ध लोकपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग असलेल्या या उत्सवाला शहराच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. यावेळी प्रवीण तरडे यांनी पिवळी मारबतची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा, उत्सवाचे महत्त्व तसेच नागपूरच्या लोकसंस्कृतीतील मारबत उत्सवाचे स्थान याबाबत माहिती जाणून घेतली. त्यांनी या ऐतिहासिक परंपरेचे आणि तिच्या जतनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले तसेच दोघांनी विधिवत मारबतचे पूजन केले.














