नागपुर : नागपुर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ची सेवा नागपुर-आदासा मार्गावर नियमित सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी महापौर नंदा ठाकरे यांनी मोरभवन येथे हिरवा झेंडा दाखवून बस सेवाला प्रारंभ केला.
मोरभवन-खंडळा-सिल्लोरी मार्गे चार फेऱ्यांद्वारे नागरिक व भाविकांसाठी अधिक सोयीस्कर व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, सह धर्मदाय आयुक्त आभा कोल्हे, क्रीडा समिती सभापती दर्शनी धवड, नगरसेवक विजय होलले, नगरसेविका माया हाडे, नगरसेविका अर्चना पडोळे, प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे, आदासाचे सरपंच चेतन निंबाळकर, देवस्थानचे मुलमूले व चलोची चमू तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, आपली बसचे चालक-वाहक उपस्थित होते. परिवहन सभापती मंगला खेकरे व युक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली आहे.
नागपुर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने ४ सप्टेंबरपासून मोरभवन (आपली बस टर्मिनल) ते आदासा मंदिर (मार्गे खंडाळा व सिल्लोरी) या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर आपली बस सेवाचा शुभारंभ केला आहे. या नवीन സേवेमुळे नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होणार असून, प्रसिद्ध आदासा मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी एक सोयीस्कर, आरामदायक आणि परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
नवीन बस सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये
मार्ग : मोरभवन (आपली बस टर्मिनल) ते आदासा मंदिर (मार्गे खंडाळा व सिल्लोरी).
फेऱ्या : दोन्ही बाजूंनी दररोज ४ फेऱ्या.
तिकीट दर : पूर्ण तिकीट- ६८ रुपये । हाफ तिकीट- ३५ रुपये.
उद्दिष्ट : ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि आदासा मंदिरासाठी सुलभ प्रवास सुविधा निर्माण करणे.
बसच्या वेळापत्रकाचा तपशील
मोरभवन (आपली बस टर्मिनल) ते आदासा मंदिर
सकाळी ०६:३० । सकाळी ०९:३० । दुपारी ०२:०० । सायंकाळी ०५:००
आदासा मंदिर ते मोरभवन (आपली बस टर्मिनल)
सकाळी ०७:५० । सकाळी १०:५० । दुपारी ०३:२० । सायंकाळी ०६:२०














