मनपाची कारवाई; जागा गैरवापरापासून रोखण्यासाठी तात्पुरती व्यवस्था
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : पूर्व शंकरनगर परिसरातील हॉटेलचालकांकडून गैरवापर होत असलेली जागा आता टिनाचे कुंपण उभारून बंदिस्त करण्यात आली आहे. त्यामुळे या जागेचा तात्पुरत्या वापरासाठीही गैरवापर करता येणार नाही, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. परिसरातील दारू पार्टीऱ्यांच्या मुद्द्यावरून मागील सुनावणीत न्यायालयाने मनपाच्या कार्रवाईबाबत नाराजी व्यक्त केली होती.
शंकरनगर परिसरातील रेस्टॉरंटच्या अनधिकृत वापरसंदर्भात स्थानिक रहिवासी डॉ. ललित हारोडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. शंकरनगरच्या दिशेने असलेल्या नाल्यावर करण्यात आलेल्या अवैध बांधकामावर कायस्वरूपी कार्रवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता. तसेच बांधलेली भिंत पाडण्यासाठी किती वेळ लागणार, तोपर्यंत अवैध वापराला आळा घालण्यासाठी कुंपणासारखी तात्पुरती व्यवस्था का करण्यात येत नाही, असेही विचारण्यात आले होते. मनपाकडन करण्यात आलेली कार्रवाई अपुरी असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला होता.
या मुद्द्यांची दखल घेत न्यायालयाने अवैध बांधकामावर करण्यात आलेल्या ठोस कार्रवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश मनपाला दिले होते. त्यानुसार, हॉटेलचालकांकडून गैरवापर होत असलेली जागा पूर्णपणे बंदिस्त असल्याचे मनपाने न्यायालयाला सांगितले. त्यासाठी टिनाचे कुंपण उभारण्यात आले असून, तात्पुरत्या वापरासाठी ते कोणीही हटवू शकणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली है. या कार्रवाईची छायाचित्रेही मनपाने न्यायालयात सादर केली. प्रकरणाची पुढील सुनावणी ७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
परिसरातील जिवंत वीजवाहिन्यांचा प्रश्न
परिसरातील धोकादायक जिवंत वीजवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी मनपाच्या धरमपेठ झोनच्या अधिकाऱ्यांनी महावितरणच्या शंकरनगर येथील कनिष्ठ अभियंत्यांची भेट घेतली. या वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याची विनंती महावितरणकडे करण्यात आली. मात्र, त्यासाठी अधीक्षक अभियंत्यांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. यानंतर अधीक्षक अभियंत्यांच्या परवानगीसाठी ३ सप्टेंबर रोजी महावितरणला पत्र देण्यात आल्याची माहिती मनपाने न्यायालयाला दिली.












