बेस साऊंडवर निबंध, टॉप व मिडल साऊंडला परवानगी
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर शहरात डीजे व साऊंड सिस्टीमवरील सरसकट बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या मागणीसंदर्भात भारतीय जनता पार्टी नागपुर शहराच्या वतीने शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आयुक्तांशी झालेल्या चर्चेत डीजे व साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला.
नागरिकांना सर्वाधिक त्रास होणारा तसेच जास्त व्हायब्रेशन व ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्या बेस साऊंडवर निबंध कायम ठेवण्यात येतील, तर टॉप व मिडल साऊंड सिस्टीमच्या वापरापर सरसकट बंदी राहणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी आश्वसित केले.
या निर्णयामुळे ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच नागरिकांना होणारा त्रासही कमी होईल. त्याचबरोबर डीजे व साऊंड सिस्टीम व्यवसायाशी संबंधित असलेले अनेक व्यावसायिक, कामगार व त्यांच्या कुटुंबांच्या रोजगारावरही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत निश्चित करण्यात येणारे हे नियम केवळ विशिष्ट उत्सवापुरते मर्यादित न ठेवता पुढील ३६५ दिवस सर्वांसाठी समान पद्धतीने लागू राहतील, असेही आयुक्तांनी आश्वसित केले. त्यामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी समान निकष लागू होतील आणि नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नागपूर शहरातील नागरिकांच्या भावना, कायदा व सुव्यवस्था, पर्यावरण संरक्षण तसेच डीजे व साऊंड सिस्टीम व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या रोजगाराचा विचार पोलिस प्रशासनाने करावा असे सांगून जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी लावून धरली. तत्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार मानले. निवेदन देताना आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, शहर महामंत्री सर्वश्री श्रीकांत आगलावे, रितेश गांवडे, संदीप जाधव, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, नगरसेविका लक्ष्मी यादव, दिलीप दिवे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.












