गरब्यांच्या गर्दीत नव्या टीनेजर ग्राहकांभोवती पडणार फास
प्रसन्न जकाते
नागपूर : उत्सवाच्या काळात साखरे, खाद्यतेल आणि अन्नधान्याच्या किमती वाढलेले ऐकले असेल, पण एमडी आणि हेरॉईनचे दर वाढल्याचे कधी ऐकले आहे का? नसेल ऐकले तर जाणून घ्या, यंदा नवरात्राच्या काळात एमडी आणि हेरॉईनचे दर नागपुरात वाढणार आहेत. होय, अगदी बरोबर वाचले. अमली पदार्थांचे दर तस्करांकडून वाढविण्यात येणार आहेत.
नागपुरातील अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात ही दरवाढ केली जाणार आहे. एमडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेफेड्रोनच्या विक्रीसंदर्भात उत्सवकाळात दर वाढविण्याची आणि नव्या ग्राहकांना जाळ्यात ओढण्याची तयारी सुरू आहे.
पबमधील गर्दी वळते उत्सवाकडे
नागपुरात दरवर्षी नवरात्रोत्सवात पब आणि नाइटलाइफच्या तुलनेत गरबा-दांडियाच्या कार्यक्रमांकडे तरुणाईचा मोठा ओघ असतो. याच गर्दीचा फायदा घेत अमली पदार्थ विक्रेते नव्या ग्राहंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचे पूर्ण प्लॅनिंग तस्करांनी तयार केले आहे. त्यामुळे गरबा आयोजक, पालक आणि पोलिसांसमोर केवळ कायदा-सुव्यवस्थेचे नव्हे, तर तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्याचेही मोठे आव्हान उभे राहणार आहे.
जुन्या ग्राहकांसाठी वेगळे दर
उत्सवाच्या काळात जास्त पैसा कमावण्यासाठी नागपुरात एमडी, हेरॉईनची दरवाढ झाली आहे. नियमित ग्राहकांसाठी एमडीची एक ग्रॅम पावडर १ हजार ८०० रुपयांना विकली जाईल. नव्या ग्राहकांकडून याच एक ग्रॅमसाठी दोन हजार रुपये वसूल केले जातील. नवीन ग्राहकांना सुरुवातीला एमडीपेक्षा गांजा दिला जाणार आहे.
वाढीव दरांपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे नवीन ग्राहक तयार करण्यासाठी तयार झालेला प्लान. नवीन ग्राहक तयार करण्यासाठी १७ ते १९ वयोगटातील मुले-मुली हेरण्यात येणार आहेत. त्यात विशेषतः श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय परिवारातील मुलांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गरबा खेळला जातो, त्या मैदानात न जाता बाहेरच्या गर्दीत नवीन ग्राहक हेरले जाणार आहेत. त्यासाठी या मुला-मुलींच्या ‘म्युचुअल फ्रेंड्स’ची मदत घेतली जाईल.
नवे ग्राहक, नवे चेहरे
ड्रग्ज विकणाऱ्या नियमित चेहऱ्यांवर पोलिसांची नजर असते. त्यामुळे एमडी विकणारी पूर्वीची चेन यंदा गरब्यात दिसणार नाही. त्याऐवजी नवीन पंटर तयार करण्यात आले आहेत. त्यांची ट्रेनिंग सध्या सुरू आहे. यात कॉलेज तरुणांचा समावेश सर्वाधिक आहे. त्यामुळे पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. परिणामी पोलिसांना उत्सवाच्या काळात एमडी विक्री करणाऱ्या या नवीन चेहऱ्यांना हुडकून काढण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे.













