गीतामंदिराजवळील म्हाडा कॉलोनीतील घटना
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : बांधकामस्थळी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक टॉवर क्रेन कोसळली आणि काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत दोन मजुरांना आपला जीव गमवावा लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर दोन मजूर जखमी झाले. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास कॉटन मार्केट चौकातील गीतामंदिराजवळ असलेल्या म्हाडा कॉलोनीतील ही घटना घडली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बांधकामस्थळी काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कॉटन मार्केट चौक परिसरातील म्हाडा कॉलोनी्त बांधकामाचे काम सुरू आहे. याच ठिकाणी शुक्रवारी सकाळी काम सुरू असताना टॉवर क्रेन अचानक कोसळली. क्रेन कोसळल्याचा आवाज आणि दुर्घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांचेच घबराट निर्माण झाली. घटनास्थलली एकच धावपळ उडाली. या दुर्घटनेत विश्वनाथ कटाणे, वय ४० वर्षे, रा. गोंदिया आणि मुकेश निषाद, वय २५ वर्षे, रा. जीनपुर, उत्तर प्रदेश या दोन मजुरांचा मृत्यू झाला.
टॉवर क्रेन अचानक कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्रेन उभारणीतील तांत्रिक त्रुटी, यंत्रणेतील बिघाड किंवा बांधकामस्थळी सुरक्षेचे नियमांचे पालन झाले होते का, याची माहिती मिळणे आवश्यक आहे. तपासानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.
नागपुरात बांधकामस्थळी काम करताना উंचावरून पडून मजुरांच्या मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. आता टॉवर क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तामुळे बांधकामस्थळावरील सुरक्षा व्यवस्था, यंत्रसामग्रीची नियमित तपासणी आणि कामगारांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. बांधकाम व्यवसायिकांकडून सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का, याची तपासणी करण्याची गरजही या घटनेने अधोरेखित केली आहे.













