७८ चक्र्या जप्त
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : प्रतिबंधित नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने साठा बाळगणाराऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ने कारवाई केली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्सार नगर परिसरात रविवारी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी फैजान अख्तर (३०, रा. अन्सार नगर, अन्सार मशिदजवळ, मोमीनपुरा) याच्याकडून विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या एकूण ७८ चक्र्या जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख २८ हजार ५०० रुपये आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६.१० वाजण्याच्या दरम्यान अन्सार नगरातील नजीर शेख कय्युम शेख यांच्या दुकानात छापा टाकला. यावेळी फैजान अख्तर हा शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगताना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडून ७८ चक्र्या जप्त केल्या. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ५, १५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मनोज कुमार रेड्डी (रा. गोंदिया) हा आरोपी पसार असून, पुढील तपासासाठी फैजानला तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.















