अर्धकृती पुतळ्याचे अनावरण
लोकवाहिनी न्यूज
पुणे : दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांच्या कामकाजाची इत्थंभूत माहिती असलेले अजितदादा हे ग्रामीण विकास व सहकार क्षेत्रचे चालते-बोलते ज्ञानकोश होते आणि त्यांची कार्यपद्धती ही नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी एका विद्यापीठाप्रमाणे आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उभारण्यात आलेल्या लोकनेते अजित पवार यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराचे ‘अजितदादा पवार प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर नेहरू मेमोरियल हॉल येथे आयोजित कार्यक्रमात शाह बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, विधानसभाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, रवींद्र चव्हाण, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.















