उंची १४ इंच, किमत लाखांमध्ये प्रतिदिन ५ लिटरपर्यंत दूध
लोकवाहिनी न्यूज
अजमेर : उंट आणि घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय पुष्कर पशुमेळ्यात यंदा जगातील सर्वात लहान गायीच्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे। दक्षिण भारतातील दुर्मिळ पुंगनूर जातीच्या गायी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे। अवघी १४ इंच उंची असलेल्या या चिमुकल्या गायी तिच्या आकर्षक रूपामुळे मेळ्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत।
पुंगनूर ही जगातील सर्वात लहान गायींच्या जातींपैकी एक मानली जाते। सर्वसाधारणपणे तिची उंची दोन ते साडेतीन फूट असते। वजन ११५ ते २०० किलोपर्यंत असते। रुंद कपाळ, छोटी शिंगे आणि जमिनीला टेकणारी लांब शेपटी ही तिची वैशिष्ट्ये आहेत। पांढरा, तपकिरी, लाल अशा विविध रंगांत या गायी आढळतात।
मिनी माऊस, विचूर गायींचेही आकर्षण
पुंगनूरसोबतच १५ ते २० इंच उंचीच्या मिनी माऊस आणि २५ ते २८ इंच उंचीच्या विचूर जातीच्या गायीही पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत। जयपूरचे पशुपालक अभिनव तिवारी यांनी या दुर्मिळ जातींच्या सुमारे १५ गायी मेळ्यात आणल्या आहेत। त्यांच्या फार्मवर अशा ५० हून अधिक गायी आहेत। या गायी विकण्यापेक्षा भारतीय दुर्मिळ गोवंशाच्या जातींबाबत जनजागृती करणे हा त्यांचा उद्देश आहे।
या गायींचे पालनपोषणही तुलनेने कमी खर्चाचे आहे। कमी जागेत त्यांचे संगोपन करता येते। दररोज सरासरी एक ते साडेतीन लिटर दूध देणारी ही गाय चांगल्या आहारावर पाच लिटरपर्यंत दूध देते। तिच्या दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण ५.४ ते ८ टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगितले जाते। त्यामुळे या जातीच्या गायींना पशुपालकांकडून विशेष पसंती मिळत आहे।
किंमत लाखांमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पुंगनूर गायींचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर गायीच्या या प्रजातीबाबत देशभरात उत्सुकता वाढली। वय, शुद्धता आणि गर्भधारणनुसार या गायींची किंमत हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत जाते। चांगल्या प्रतीच्या आणि गर्भवती गायींसाठी मोठी रक्कम मोजली जाते।














