आईच्या आरोपाने प्रकरणाला नवे वळण
लोकवाहिनी न्यूज
गोंदिया : पुण्यातील इंडिगो एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या वर्षा तुरकर (३५) यांच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। वर्षा यांच्या हत्येमागे ६० लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा वाद असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या आईने केला आहे। या आरोणामुळे पोलिसांनी आर्थिक व्यवहारासह इतर महत्त्वाच्या बाबींचा तपास सुरू केला आहे। वर्षा ७ नोव्हेंबर रोजी आपल्या माहेरी आल्या होत्या। गावाला येण्यापूर्वी त्यांनी पैशांच्या व्यवहाराबाबत आईशी चर्चा केली होती। मात्र, त्यावेळी आईने त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली नव्हती। त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी त्या गोंदियातील कौटुंबिक परिचित नितेश अग्रवाल याच्यासोबत गेल्या होत्या। या दोघांमध्ये ६० लाख रुपयांच्या व्यवहारावरून वाद झाला असावा आणि त्यातूनच वर्षा यांची हत्या करण्यात आली असावी, असा संशय त्यांच्या आईने व्यक्त केला आहे।
वैनगंगा नदीकाठच्या जंगल परिसरात वर्षा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली। उत्तरीय तपासणी अहवालात त्यांचा मृत्यू चाकूने भोसकल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे पोलिस आर्थिक व्यवहार, घटनाक्रम आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांची तपासणी करत आहेत। वर्षा यांच्या अंगावरील दागिने सुरक्षित असणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला कोणतीही दुखापत न होणे, यामुळे हत्येमागील कारणाबाबत संशय अधिक वाढला आहे। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची पाच पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत। येत्या दोन ते तीन दिवसांत तपासाला ठोस दिशा मिळेल, असा विश्वास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी व्यक्त केला। उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली।
















