आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : राज्यात येत्या २ तारखेपासून अद्ययावत अशा ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ संकल्पनेवर आधारित नव्या १०८ रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मुंबईतून केला जाणार असून, पहिल्या टप्प्यात ३०० नव्या सुसज्ज रुग्णवाहिका ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली। बुधवारी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी राज्यातील रुग्णालयांचे वार्षिक फायर ऑडिट, नागपूर जिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण, बोगस डॉक्टर प्रकरण आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या उपाययोजनांवर सविस्तर भाष्य केले।
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे वाहतूक कोंडीत अडकल्याने २० महिन्यांच्या चिमुकल्याचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे। अलिबागमधील दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, २०१३-१४ च्या दरम्यान राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली होती। आता नव्या निविदा प्रक्रियेद्वारे ही सेवा अधिक अद्ययावत केली जात आहे। नव्या रुग्णवाहिकांमध्ये ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबवली जाणार आहे। रुग्णवाहिकेत रुग्णाला घेतल्याक्षणीच तिथे आयसीयू बेडच्या धर्तीवर डॉक्टर्स आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणेमार्फत तात्काळ उपचार सुरू होतील। येत्या २ तारखेला मुंबईत या अद्ययावत १०८ सेवेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असून, ३०० नव्या रुग्णवाहिका सेवेत दाखल होतील।
सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी राज्यभरात ‘आरोग्य संवाद यात्रा’ सुरू करण्यात आली असून, याअंतर्गत आपण वर्धा आणि भंडारा जिल्ह्यांच्या २ दिवसीय दौऱ्यावर आलो आहोत। तसेच ‘महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’च्या संदर्भात डॉक्टरांसोबत महत्त्वाची बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले।
जिल्हा रुग्णालयाचे अधिवेशनात लोकार्पण
नागपूर येथील मानकापूर परिसरात तयार झालेल्या जिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान केले जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली।
भंडारा आणि अमरावती येथील रुग्णालयांमध्ये घडलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कडक पावले उचलली आहेत। अमरावती घटनेतील दोषी यंत्रणेवर कारवाई करण्यासोबतच संबंधित कंपनीला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यात आले आहे। तसेच, खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरच्या वापराबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांचे दरवर्षी ‘फायर ऑडिट’ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली असल्याचे आबिटकर यांनी स्पष्ट केले।
अशोक खरात याच्यावरील भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि परदेशातून एमबीबीएस करून एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण न होता बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले।
दुष्काळी परिस्थितीमुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची स्वतंत्र मानसिक आरोग्य यंत्रणा (विंग) कार्यरत आहे। पुढील टप्प्यात ही यंत्रणा अधिक गतिमान करून शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही प्रकाश आबिटकर यांनी सांगितले। यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये ७५ वर्षीय आजीला रील बनवण्याचे व्यसन लागून रुग्णालयात मोबाईल चोरल्याच्या घटनेवर बोलताना, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच मोबाईल वापराबाबत स्वतःवर काही बंधने आणि आचारसंहिता पाळणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले।
















