प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’ आता पाचव्या सीझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या नव्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, येत्या ३ डिसेंबरला ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे। ‘प्राइम व्हिडिओ’ने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा फुलेरा गावातील गमतीजमती, राजकारण आणि मनोरंजक घडामोडी पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे। ‘द व्हायरल फीव्हर’ (टीव्हीएफ) या निर्मिती संस्थेने ‘पंचायत’ची निर्मिती केली आहे।
दीपक कुमार मिश्रा यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून, दीपक कुमार मिश्रा, चंदन कुमार आणि अरुणाभ कुमार यांनी कथेचे लेखन केले आहे। पाचव्या सीझनमध्ये अभिनेता जितेंद्र कुमार पुन्हा एकदा सचिव जींच्या भूमिकेत दिसणार आहे। त्याच्यासोबत रघुबीर यादव, नीना गुप्ता, सुनीता राजवार, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक हे कलाकारही आपापल्या जुन्या भूमिकांमध्ये दिसतील। नव्या सीझनमध्ये फुलेरा गावातील राजकारणात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत। यावेळी गावाला नवीन मुखिया मिळाले आहेत। तसेच, प्रधान-पतीच्या भूमिकेत असलेला बनराकस आता स्वतःच्या योजनांनुसार गावाचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्या या नव्या भूमिकेमुळे गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे। त्याच्या निर्णयांमुळे गावाचा विकास होणार की नव्या समस्या निर्माण होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।
यासोबतच गावातील लोकांचे नातेसंबंध, त्यांच्यातील मतभेद आणि रोजच्या आयुष्यातील विनोदी प्रसंगही या सीझनमध्ये पाहायला मिळतील। ‘प्राइम व्हिडिओ इंडिया’चे मनीष मेंघानी यांनी सांगितले की, गेल्या चार सीझनमध्ये फुलेरा गाव आणि तेथील पात्रे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहेत। पाचव्या सीझन मधून ही कथा पुढे नेण्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले। तर TVF चे अध्यक्ष विजय कोशी यांनी या सीरिजच्या यशाचे श्रेय तिच्यातील वास्तववादी पात्रे, नाती आणि रोजच्या जीवनातील प्रसंगांना दिले आहे।













