आकाशात होणार सुखोईची गर्जना, सारंगच्या कसरती
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचे, आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि हवाई कौशल्याचे दर्शन घडविणाऱ्या ‘एअर फेस्ट’चे आयोजन यंदा दोन दिवस करण्यात येणार आहे। वायुसेननगर येथे २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी हा हवाई महोत्सव रंगणार असून, यामध्ये सुखोई-३० या अत्याधुनिक लढाऊ विमानासह सूर्यकिंरण अॅरोबॅटिक टीम आणि विविध प्रात्यक्षिक पथकांचा थरार अनुभवता येणार आहे। यापूर्वी हा कार्यक्रम एकाच दिवसासाठी नियोजित होता। मात्र, प्रेक्षकांना अधिकाधिक हवाई प्रात्यक्षिकांचा आनंद घेता यावा, यासाठी तो दोन दिवस आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।
प्रसिद्ध ‘सूर्य किरण अॅरोबॅटिक टीम’ आणि ‘सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम’ ची नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिके या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे। तसेच ‘आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीम’द्वारे थरारक सादरीकरण देखील पाहायला मिळतील। या कार्यक्रमात ‘गरुड स्पेशल फोर्सेस’ची व्यावसायिकता आणि कार्यक्षमता, ‘एअर वॉरियर ड्रिल टीम’ची अचूकता आणि समन्वय, आणि आघाडीची लढाऊ विमाने ‘एसयू-३० एमकेआय’चे प्रदर्शन देखील समाविष्ट आहे।
या कार्यक्रमाचा उद्देश लष्करी हवाई क्षेत्राला सर्वसामान्यांच्या जवळ आणणे, युवा पिढीला प्रेरित करणे आणि भारतीय हवाई दलाची क्षमता व विविध पैलूंची ओळख करून देणे हा आहे। तसेच, भारतीय हवाई दलाची ओळख असलेली उत्कृष्टता, व्यावसायिकता, समर्पण आणि आत्मनिर्भरता ही मूळ मूल्ये अधोरेखित करणे हा देखील यामागचा उद्देश आहे।
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला ‘सन्माननीय अतिथी’ म्हणून उपस्थित राहण्यास सहमती दर्शवली आहे। सुरक्षेच्या अनिवार्य गरजा आणि परिचालन नियमावली लक्षात घेत, हा ‘एअर फेस्टिव्हल’ वायुसेना नगरच्या सुरक्षित परिसरात आयोजित केला जात आहे।
सामर्थ्याचे प्रदर्शन
एअर फेस्टमध्ये सुखोई-३० या अत्याधुनिक लढाऊ विमानाच्या हवाई कौशल्याचे प्रदर्शनही होणार आहे। भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील महत्त्वाच्या लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या सुखोईच्या हवाई कसरती हे महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण असेल। वेग, अचूकता आणि हवाई नियंत्रणाच्या जोरावर हे विमान आकाशात आपले सामर्थ्य दाखवणार आहे। यासोबतच आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीमकडून उंच आकाशातून उडी मारण्याचे साहसी प्रदर्शन केले जाणार आहे। गरुड विशेष दलाचे कौशल्य आणि एअर वॉरियर ड्रिल टीमचे शिस्तबद्ध संचलनही पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे।
















