पराभवानंतर तृणमूलचे निवडणूक आयोगावर घणाघाती आरोप
लोकवाहिनी न्यूज:कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ५ मे रोजी निवडणूक आयोगावर थेट आणि तीव्र टीका केली. त्यांनी आरोप केला की, त्यांना जाणूनबुजून पराभूत करण्यात आले असून सुमारे १०० जागा लुटल्या गेल्या आणि ९० लाख मते कमी करण्यात आली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे.’ त्यांनी स्पष्ट केले की त्या राजीनामा देणार नाहीत आणि नैतिकदृष्ट्या त्यांचा विजय झाला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही आरोप करत सांगितले की, भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केला. या निवडणुकीत लोकांच्या संवैधानिक हक्कांवर गदा आली असून ईव्हीएम संदर्भातही त्यांनी शंका व्यक्त केली.
मतदानानंतरही मशिनमध्ये ८० ते ९० टक्के चार्ज कसा राहतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणावर अटक, छापेमारी आणि अधिकारी बदल करण्यात आल्याचा आरोपही ममतांनी केला. यासोबतच त्यांनी सांगितले की, त्यांनी संपूर्ण यंत्रणेविरुद्ध लढा दिला. त्यांनी एसआयआर प्रक्रियेतून लाखो मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला आणि न्यायालयात गेल्यानंतर काही नावे पुन्हा समाविष्ट करण्यात आल्याचे नमूद केले.








