३ डिसेंबरपर्यंत कामकाज : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक मांडण्याची शक्यता
लोकवाहिनी न्यूजनवी दिल्ली : आवश्यक सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार लोकसभेची बैठक ३० नोव्हेंबरला, तर राज्यसभेची बैठक २ डिसेंबर रोजी पुन्हा बोलावण्याची विनंती सरकारने केली आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमांवरून ही माहिती दिली.
लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांना अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि २ डिसेंबर रोजी सभागृहांच्या बैठका पुन्हा बोलावण्याची विनंती करण्यात आली आहे. आवश्यक सरकारी कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले. मात्र, या बैठकांमध्ये नेमकी कोणती विधेयके मांडली जाणार आहेत, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
दरम्यान, सरकार या काळात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणासंदर्भातील विधेयके आणू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांची संख्या वाढवून कमाल ८५० करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे. तसेच संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचाही यामागे उद्देश आहे.
हिवाळी अधिवेशनाबाबत संभ्रम
दरम्यान, यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार की नाही, याबाबतही संभ्रम कायम आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८४ आणि २०२० या वर्षांत हिवाळी अधिवेशन झाले नव्हते. त्यामुळे सरकारच्या पुढील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, १३ ऑगस्ट रोजी दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अद्याप अधिवेशनाचे अधिकृत सत्रावसान झालेले नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतरही १०० दिवसांहून अधिक काळ ते तांत्रिकदृष्ट्या सुरू आहे.












