लोकवाहिनी न्यूज,,नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला। बारावीप्रमाणे दहावीतही नागपूर विभागाच्या निकालात घट झाली। विभागाचा निकाल ८९.०७ टक्के लागला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात दीड टक्क्यांची घट झाली आहे। मात्र यंदा एकूण राज्याच्या निकालात २ टक्क्यांची घट झाल्याने त्याचा लाभ मिळत रँकिंगमध्ये नागपूर विभाग एक पायरी वर चढून ७व्या स्थानी पोहोचला आहे।
विभागाच्या सहा जिल्ह्यांतून यंदा १,४७,७८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, ज्यापैकी १,३१,६४५ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत। बारावीप्रमाणे दहावीतही आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निकालात मुली वरचढ ठरल्या आहेत। यंदा ७५,५२२ मुले प्रविष्ट झाले होते, ज्यामधून ६४,१९३ उत्तीर्ण झाले असून मुलांचे प्रमाण ८४.९९ टक्के आहे। दुसरीकडे प्रविष्ट झालेल्या ७२,२६१ मुलींपैकी ६७,४५२ म्हणजे ९३.३४ टक्के मुली यशस्वी झाल्या आहेत। त्यांचे प्रमाण मुलांपेक्षा ८.३५ टक्क्यांनी अधिक आहे।
विभागाच्या सहा जिल्ह्यांमध्ये निकालात नागपूर जिल्हा सर्वोत्तम ठरला आहे। जिल्ह्यात २८,४६७ मुले आणि २७,९२१ मुली, असे एकूण ५६,३८८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। त्यापैकी ५२,६९३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत। जिल्ह्यातही मुलींनीच बाजी मारली आहे। २५,८०७ मुले (९०.६५ टक्के) आणि २६,८८६ मुली (९६.२९ टक्के) उत्तीर्ण झाल्या। मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण ५.३६ टक्के अधिक आहे।
तोतयागिरी करणाऱ्या चौघांना ५ परीक्षांची बंदी
कॉपीमुक्त अभियानांतर्गत कडक यंत्रणा राबविल्यानंतरही दहावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या ३२ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले। या ३२ विद्यार्थ्यांची सुनावणी घेतल्यानंतर ज्या विषयात गैरप्रकार करताना सापडले, त्याचे संपादनूक रद्द करून त्यांना नापास करण्यात आले। याशिवाय परीक्षेत स्वतःच्या जागी तोतये व्यक्ती बसविण्याचा प्रकारही यावेळी घडला। गोंदिया जिल्ह्यात अशी तोतयागिरी करणारे ४ विद्यार्थ्यांनी सापडले होते। त्या चारही विद्यार्थ्यांना यंदाची आणि पुढच्या ४ अशा पाच परीक्षांवर बंदी घालण्याची कठोर कारवाई बोर्डाने केली आहे।
गुणपडताळणीसाठी २३ मे पर्यंत मुदत
निकालावर असमाधानी असलेले विद्यार्थी येत्या ९ मे पासून २३ मे पर्यंत गुणपडताळणीसाठी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात। त्यांना प्रत्येक विषयासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागेल। याच कालावधीत विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीची देखील मागणी करू शकतात। त्यासाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क भरावे लागेल। छायाप्रती घेतल्यानंतर विद्यार्थी पुढच्या पाच कार्यालयीन दिवसांमध्ये उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात, यासाठी देखील प्रति विषय ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे।







