लक्ष्मण हाके मुख्यमंत्री फडणवीसांवर आक्रमक
लोकवाहिनी न्यूज
सोलापूर : ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री साहेब, तुम्हीही ओबीसींना डावलले, तर तुमचे भवितव्य आणि अस्तित्व काळच ठरवेल, अशा कडक शब्दांत ओबीसी समाजाच्या अधिकारांसाठी काम करणारे नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली.
राज्यात पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा विषय तापत चालला आहे. जर तुम्ही ओबीसींच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले, तर तुमच्या भवितव्याचे निर्णय काळ ठरवेल, असा कडक इशारा हाकेंनी दिला.
हाके यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की, तुम्ही कितीही गुपचूप धोरणे आखली, तरी ओबीसींच्या आरक्षणाचे अधिकार आता पूर्णपणे संपले आहे. ज्या ओबीसी बांधवांनी तुमच्यावर विश्वास ठेवून सत्ता आणली, त्यांच्याशी आता आम्ही फक्त पश्चात्ताप करतो. मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली सरकार जे निर्णय घेत आहे, ते पूर्णपणे बेकायदेशीर आहेत आणि जातीय हक्क ओबीसींना दिले जाणे आवश्यक आहे; ते मराठा समाजाकडे सोडणे ही चुकीची पद्धत आहे.
हाके यांनी महायुतीच्या काळातील अनुभव आठवत सांगितले की, गेल्या निवडणुकीत आम्ही उघडपणे तुम्हाला मत दिले आणि सत्ता आणून दिली. मात्र सत्तेत आल्यानंतर, तुम्ही ओबीसींना मागे टाकले, असा आरोप त्यांनी केला. राज्यात नव्याने प्रकट झालेल्या कॉकरोच जनता पार्टीवरही हाके यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, हा पक्ष सध्या नवशिक्या असून त्याच्या कार्यपद्धती आणि विचारसरणीची स्पष्टता अजून आलेली नाही. तरीही राज्यातील तरुण वर्ग आणि नवीन पिढी अत्यंत अस्वस्थ संतप्त आहे; या संतापाकडे सत्ताधारी दुर्लक्ष करतात, तर त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो, असा इशारा हाके यांनी दिला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या चर्चेत हाके यांनी स्पष्ट केले की, राज्यात सध्या विरोधी पक्षाची जागा रिकामी आहे आणि आमच्यासारखे चळवळीतील युवा ती भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. झेन झेड म्हणून उदयास आलेल्या कॉकरोच पार्टीच्या आगमनामुळे काही आशा निर्माण होत आहेत. आरक्षण आणि विमुक्त ओबीसींच्या हक्कांबाबत त्यांची स्पष्ट भूमिका समोर आल्यावर आमची चर्चा होईल, असे सांगून त्यांनी परिस्थितीचे महत्त्व अधोरेखित केले.
त्याचबरोबर, आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी पंढरपुरात सुरू होणारा अन्नत्याग आंदोलनाबाबत हाके यांनी जोरदार टीका केली. त्यांनी म्हणाले, ज्या पवार कुटुंबाने वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या अन्नात माती घातली, त्यांचा नातू आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय, हे खूप मोठा जोक आहे. हा फक्त राजकीय स्टंट आणि नौटंकी आहे, असे हाके यांनी सडकून सांगितले. संपूर्ण वक्तव्यात हाके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना चेतावणी दिली की, ओबीसी समाजाच्या हक्कांसोबत खेळल्यास त्यांचा परिणाम राजकीय आणि सामाजिक रूपाने गंभीर होऊ शकतो. तसेच त्यांनी राज्यातील नव्या चळवळी आणि युवा वर्गाची भूमिका प्रकट करत, सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या संतापाकडे दुर्लक्ष करू नये, असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील हे राजकीय वातावरण आता ओबीसी आरक्षण आणि युवा चळवळीच्या संदर्भात तापलेले असून, पुढील काळात याचे परिणाम कोणत्या दिशेने जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.










