लोकवाहिनी न्यूज
बुलडाणा : भरधाव खासगी लक्झरी बस ट्रकला आदळून झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले. यापैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. ही दुर्घटना मेहकरजवळ Pimpri Maali-शहापूर गावाजवळ सोमवारी पहाटे ४ च्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार, बाबा ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस पुण्याहून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटे ४ वाजेच्या सुमारास बस पिंपरी माळी गावाच्या शिवार परिसरात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे भरधाव बसने समोरून जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर बसमध्ये किंचाळ्या व आक्रोश सुरू झाला. धडकेमुळे बसचा पुढील भाग दबला गेल्याने काही प्रवासी सुमारे एक ते दीड तास बसमध्ये अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, मेहकर पोलिस तसेच समृद्धी महामार्गावरील बचाव पथक रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कटरच्या साहाय्याने आणि इतर प्रयत्नांद्वारे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका केली.
जखमींना तातडीने मेहकर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. पुढील तपास मेहकर पोलिस करत आहेत.












