कारचालकाने दार उघडल्याने घडला अपघात
लोकवाहिनी न्यूज
खापरखेडा : स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीतील मुख्य बाजारपेठेत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. एका कारचालकाने दार उघडले असता त्याला दुचाकी धडकली. दुचाकी चालक व त्याची पत्नी खाली पडली. दरम्यान मागून येणाऱ्या ट्रकच्या समोरच्या चाकात महिला आल्यामुळे गंभीर जखमी झाली. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झाला असून, खापरखेडा परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
मृतक महिलेचे नाव शबनम सत्तार छवारे वय ४० वार्ड क्रमांक २ सोनार गल्ली मुख्य बाजारपेठ खापरखेडा असे आहे तर सत्तार इखाईल छवारे वय ४३ असे किरकोळ जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.
मृतक महिला शबनम छवारे या एका सोसायटीमधून काम आटोपून पती सत्तार छवारे यांच्या सोबत दुचाकी क्रमांक एमएच-४०-टी-७५९४ ने आपल्या घराकडे जात होत्या. यादरम्यान मुख्य बाजारपेठेतील चेमरी गेट अलीकडे राष्ट्रीय महामार्गावर कार क्रमांक एमएच-४०-सीए-८४१३ च्या कार चालकाने रस्त्याच्या कडेला कार उभी केली. यावेळी कारचे दार उघडले असता मागून येणारी दुचाकी कारच्या दाराला जाऊन धडकली. या विचित्र अपघातात दुचाकी वरून मृतक शबनम छवारे व सत्तार छवारे खाली पडले. याचवेळी मागून येणारा ट्रक क्रमांक एमएच-४०-सीडी-४०५० च्या समोरच्या चाकात मृतक शबनम छवारे आल्या. ट्रक चालकाने काही अंतरा पर्यंत शबनम यांना फरफट नेल्याची माहिती आहे. सदर अपघातात शबनम गंभीर जखमी झाल्या, तर त्यांचे पती सत्तार किरकोळ जखमी झाले.
यावेळी घटनास्थलली एकच गर्दी झाली. घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना देण्यात आली. नागपूर येथील मॅक्स या खाजगी रुग्णालयात शबनम यांना दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
खापरखेडा पोलिसांनी घटनास्थल गाढून पंचनामा केला. पोलिसांनी कार, ट्रक, दुचाकी ताबात घेतली आहे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.














