लोकवाहिनी न्यूज
भंडारा : अंघोळीसाठी वैनगंगा नदीत गेलेल्या सात तरुणांपैकी दोघे बुडाले. ही घटना रविवारी रात्री घडली. रविवारी सायंकाळी सुमारे साडेसहाच्या सुमारास भंडारा तालुक्यातील करचखेडा येथील वैनगंगा नदीत एका खासगी बोटीने तरुण निघाले होते.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी (७ जून) सायंकाळी सुमारे ६.३० च्या सुमारास सात जण खासगी बोटीने वैनगंगा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर अंघोळीसाठी गेले होते. अंघोळ आटोपून परत येत असताना नदीच्या मध्यभागी अचानक बोट असंतुलित होऊन उलटली. अचानक घडलेल्या दुर्घटनेत सर्वजण पाण्यात फेकले गेले. यावेळी पवन मुरली चौबे (वय ३४, रा. आंबेडकर वॉर्ड, भंडारा) आणि कृष्णा जगन्नाथ बोकडे (वय २६, रा. चांदनी चौक, भंडारा) हे दोघेही खोल पाण्यात बुडाले. तर आकाश केवट (वय २७), सुबोध विलास ढोक (वय २६), काशीनाथ फत्तू मेश्राम (वय ३२), मृणाल बाळकृष्ण मंदुकर (वय २०) आणि अर्जुन मोतीराम मेश्राम (वय २९) यांनी प्रसंगावधान राखत पोहत नदीबाहेर येण्यात यश मिळविले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार जिल्हा शोध व बचाव पथकाला त्वरित पाचारण करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. नदीपात्रातील पाण्याचा वेग आणि अंधारामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे करचखेडा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी नदीपात्रात बोटीद्वारे प्रवास करताना आवश्यक सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी केली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाह धोकादायक होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय अधिक कठोर करण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून प्रशासनाकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे माहिती देण्यात आली.











