लोकवासिनी न्यूज:नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सलील देशमुख यांची न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. २०१७ मध्ये नरखेड येथे शेतकरी प्रश्नावर केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर आणि इतर सात सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. न्यायालयाच्या या निर्णयांतर सलील देशमुख राजकारणात सक्रिय होण्याच्या चर्चा आता काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रात रंगल्या आहेत.
नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी रोहन विजयकुमार थायल यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३२१ अन्वये सरकारला खटला मागे घेण्याची परवानगी देत सर्व ८ आरोपींना दोषमुक्त केले. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, या आंदोलनात कोणालाही वैयक्तिक इजा झाली नसल्याने आणि सरकारी अभियोक्ता कार्यालयाच्या पत्रानुसार हा खटला मागे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
या निकालामुळे सलील देशमुख यांच्यासह उज्ज्वल भोयर, संजय चरडे, ईश्वर राऊतकर, नंदलाल मोवाडे, वैभव दळवी, अनिल साठोणे आणि नरेंद्र राहाटे या सर्वांचे जामीन व बाँड रद्द झाले आहेत. न्यायालयात देशमुख यांच्या वतीने ॲड. विवेक क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला.
सलील देशमुख हे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र असून, मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी काटोल-नरखेड मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यानच्या काळात, नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या मतभेदामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची समजूत काढून राजीनामा मागे घेण्याचे आवाहनही केले होते. याच काळात त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने ते अजित पवार यांच्या गटात सामील होतील, अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु त्यानंतरच्या काही अनपेक्षित घडामोडींमुळे या चर्चा थांबल्या.
सलील देशमुख सध्या कोणत्याही पक्षात पूर्णतः सक्रिय नसले तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले संबंध पूर्णपणे तोडलेले नाहीत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता ते पुन्हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होतात की नवीन राजकीय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









