वनोजामध्ये आ. देशमुखांसह अनेक ताब्यात; पोलिसांचा सौम्य लाठीमार
लोकवाहिनी न्यूज
वाशीम : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले. वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथे समृद्ध महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी शुक्रवारी शेतकरी व शिवसैनिकांसह हजारोंचा जनसमुदाय उसला. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. याखेळी पोलिस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. आ. देशमुख यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा महामार्गावर तैनात आहे. शेतकऱ्यांना केवळ ५ हजार रुपयांची तात्पुरती मदत न देता, अतिवृष्टी व पीक नुकसानाची संपूर्ण भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचे हत्यार उपसले.
शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी रोखण्यात येत असल्याचे आ. नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आ. देशमुखांच्या सहकारս शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अकोला, वाशीम जिल्ह्यात दौरे करून शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज सकाळपासून वनोजा येथे शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने दाखल झाले. आंदोलनासाठी मोठा जनसमुदाय जमला. आंदोलन रोखण्यासह कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
विभागाच्च सर्व जिल्ह्यातील दीड हजारवर पोलिस अधिकारी व कर्मचारी आंदोलनेस्थळी तळ ठोकून आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. मोठा पोलिस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलकांनी शासनावर तीव्र संताप व्यक्त केला.









