दर दोन महिन्यांनी संवाद, पुढील बैठक हैदराबादला होणार
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंडिया आघाडीची पहिली महत्त्वाची बैठक सोमवारी नवी दिल्लीत पार पडली. देशभरातील एकूण २५ राजकीय पक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचा सहभाग होता.
बैठकीचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. यावेळी राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी नेते उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदवला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील ऑनलाइन सहभागी झाले होते.
‘आप’ इंडी आघाडीचा भाग नाही
आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, आम आदमी पक्ष इंडी (इंडिया) आघाडीचा भाग नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत आम्ही सहभागी झालो नाही. ही बाब पक्षाने यापूर्वीच स्पष्ट केली होती. त्यामुळे बैठकीत सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संजय सिंह काँग्रेसवर टीका करताना म्हणाले, तामिळनाडूतील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) विश्वासात न घेता अभिनेते विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे दोन्ही पक्षांतील संबंध तणावपूर्ण झाले आहेत.
बैठकीत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी देशातील महागाई, बेरोजगारी, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ आणि आर्थिक मंदी यांसारख्या समस्यांवर चिंता व्यक्त केली. त्यांनी आरोप केला की विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेच्या नावाखाली लाखो नागरिकांचे मतदानाचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच संविधानाच्या मूल्यांवर सातत्याने आघात होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. खरगे यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीवर भर देत सांगितले की, संसदेत सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे अनेक वादग्रस्त विधेयकांना रोखण्यात यश आले. त्यामुळे आगामी काळातही ही एकता कायम ठेवणे गरजेचे आहे.









